Friday, August 26, 2011

व्यक्तिमत्व म्हणजे...

व्यक्तिमत्व या शब्दाला इंग्रजीमध्ये 'पर्सनॅलिटी' म्हणून संबोधले जाते. हा शब्द लॅटीन भाषेतील 'पर्सोना ' या शब्दापासून निर्माण झाला.पर्सोना म्हणजे मुखवटा. राममन नाटकामध्ये पात्रे नाटक प्रभावी होण्यासाठी मुखवटयांचा वापर करीत असत. यामुळे व्यक्ितचे फक्त बाहयस्वरुप प्रकट होत असे. परंतु व्यक्तिमत्वामध्ये बाहयस्वरुपापेक्षा अंत:स्वरुपाला जास्त महत्व आहे. सरळ साध्या व सोप्या शब्दात व्यक्तिमत्व या शब्दाचा अर्थ संागावयाचा झाला तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीतील कला गुण व आचार - विचार होय. प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे एक वेगळे व्यक्तिमत्व असते.
व्यक्तिमत्व देशसेवा व समाजकार्य केल्यामुळेच घडते असा बर्‍याच जणांचा समज आहे. तथापि व्यक्तिमत्व कोणत्याही क्षेत्रांत व कलेमध्ये बनविता येते. जसे महात्मा गांधीजींचे व्यक्तिमत्व देशसेवा व समाजकार्य या क्षेत्रात तयार झाले. तसेच तेंडूलकर या व्यक्तींनी आपआपल्या क्षेत्रामध्ये व्यक्तिमत्व घडविलेले दिसून येते.
आधुनिक युग हे एक स्पर्धेचे युग आहे व बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे विविध क्षेत्रांत चाललेली चढाओढ ही जीवघेणी झाली आहे. व्यवसाय टिकवण्याकरिता जाहिरातबाजी, दिखाऊपणा व इतर मार्गाचा वापर केला जात आहे. त्यमुळे प्रत्येक क्षेत्रांतील व्यक्तींची एकूण जीवनाबद्दलची विचारधारा बदलली आहे. समाजातील आपले स्थान टिकवण्याकरिता व्यक्ती दिखाऊपणाचा अवलंब करु लागली आहे. त्यामुळे त्याची व्यक्तमत्वाबद्दलची कल्पनाचा बदलली असून व्यक्तिमत्व म्हणजे रंग, रुप, पोषाख व इतर दिखाऊपणा होय, अशी झाली आहे, खरे म्हणजे व्यक्तिमत्वाचा हा एक गौण भाग आहे. रंग, रुप व पोषाखापेक्षा व्यक्तिच्या मानसिक व बौध्दिक क्षमतेला अनन्यसाधारण महत्व आहे.
व्यक्तिला जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता मानसिक व बौध्दिक क्षमतेची गरज आहे. याशिवाय तो कोणत्याच क्षेत्रात यश संपादन करु शकणार नाही. म्हणून व्यक्तिीने दिखाऊपणाचा अवलंब न करता व्यक्तिमत्व विकासाठी मानसिक व बौध्दिक क्षेमतेचा विकास केला पाहिजे. क्षमतांमध्ये प्रगती करीत असतांना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आरोग्य हा सुध्दा व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग आहे.
मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही. स्वत:ची प्रगती करीत असतांना, व्यक्तीने समाजासाठीसुध्दा कांहीतरी चांगले कार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजात त्याला एक चांगले स्थान प्राप्त होते व त्याचे समाजातील व्यक्तिमत्व उठून दिसते. याचाच अर्थ चांगल्या व्यक्तिमत्वासाठी सामाजिक कार्याची गरज आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलप्रमाणे केल्यास चुकीचे ठरणार नाही. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिच्या शारीरीक , मानसिक, बौध्दिक व सामाजिक गुणांचे एकत्रित मूल्यांकन होय.
मूल्यांकन करीत असतांना व्यक्तींच्या दोषाचासुध्दा विचार केला पाहिजे. तरच व्यक्तिमत्वाचे संपूर्ण मूल्यांकन झाल्यासारखे होईल.