Wednesday, May 2, 2018

दर्शन सगुण साकार भोळया सांभ शिवाचे...


दर्शन सगुण साकार भोळया सांभ शिवाचे...
(सत्य पात्रांची काल्पनिक शब्दांची खऱ्या साक्षात्काराची कथा...)

      आज महाशिवरात्र त्यामुळे सुट्टी म्हणून घरीच होतो. साधारणतः दुपारी दोन वाजल्याचा दरम्यान बाबा म्हणाले चिखलगी च्या शेताला जावून ये. तसाही निवांतच होतो म्हणून मी पण निघालो. कानात इयरफोन टाकले एफ.एम्. सुरु केले आणि गाड़ीला किक मारली...
             रस्त्यात माचनुर येथील श्री भगवान शंकराचे सुप्रसिद्ध मंदीर येते. मंदिरपासून भाविक भक्तांच्या आणि त्यांच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आपण एकविसाव्या शतकात आधुनिक युगात जगत असलो तरीही लोक आजही मोठ्या प्रमाणात देवावर विश्वास आणि श्रद्धा (काहीवेळा अंधविश्वास आणि अंधश्रद्धा) ठेवतात याचेच ते प्रतिक होते. आम्ही मात्र, 'देखल्या देवा दंडवत' या म्हणी प्रमाणे रस्त्याने गाड़ीवरूनच् नमस्कार करीत पुढे निघालो...
        शेतावर पोहचता पोहचता एफ. एम्. वरती ना बिबी ना बच्चा... सबसे बड़ा रुपय्या…’ हे माझे आवडते गाणे लागलेले ते ऐकत शेतावर फेरफटका मारून आम्ही (येथे आम्ही म्हणजे अनेकजण न्हवे तर अस्मादिक स्वतःस् आदरार्थी उद्बोधत आहेत) जो व्यक्ती आमचे शेत (वास्तविक ते शेत माझ्या काकुंचे आणि त्यांना रोज तिथले काम बघणे शक्य नाही म्हणून तिथे लक्ष ठेवण्याचे काम आमचे, पण इतरांसाठी तर मी शेत मालकीणीचा पुतण्या म्हणून मालक ना...) बटई ने करतो त्याचा घराकडे कूच केली. आणि त्याच मालकी हक्काने घराबाहेर उभारुन मोठ्याने हाक मारली,"हात्ताळे आहेत का घरात?" आवाज ओळखून त्यांच्या सौभाग्यवती बाहेर आल्या आणि म्हणाल्या,"नाहीत की ते घरात, आत्ताच आमच्या शेतात गेल्यात, जरा तुमी बी जावून या तिकडं आम्हा गरीबाच्या शेताला तुमचं पाय लागुद्या. आन तवर दूद गरम करून ठुटो तुमासनी."
   मग अस्मादिकांनी मोर्चा त्यांच्या शेतावर वळवला. आणि इथेच सुरु झाला आमचा वरुन माझा कड़े प्रवास... कारण ही तसेच आहे त्याचे...
   मागील तीन वर्षापासून हा शिवराप्पा हात्ताळे नामक गृहस्थ आमचे चिखलगी येथील बाविस एकर शेत बटई ने करतो. या काळात मी त्यांना जेवढया वेळा भेटलो आमच्या शेतावरच भेटलो. मात्र त्यांच्या घरी आणि शेतावर जाण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग...
     आणि मी अवाकच झालो! जो माणूस आमच्या शेतात राबतो त्यांचे स्वतःचे शेत जरी थोड़े असले तरी आमच्या शेतापेक्षा किती तरी जास्त उत्पन्न देणारे होते.
      खरे तर या माणसाची कामाची जिद्द आणि प्रामाणिक कष्ट याचेच ते फलित आहे. कारण मुळात चिखलगी हे मंगळवेढा तालुक्यातील कर्नाटक राज्याच्या हद्दीवरील दुष्काळ ग्रस्त आणि अविकसित म्हणून नाव असलेले गाव. त्यामुळे पिढ्यान पिढ्या ना इथल्या लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता झाली ना गावचा विकास. जिथे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तिथे शेतीसाठी पाणी कुठून येणार? मुळचेच शेतीला पाणी नाही आणि ना कोणतीही शासकीय जल सिंचन योजना.
    आणि असे असूनही हात्ताळे यांच्या शेतात मात्र जबरदस्त बहरलेली डाळींब बघितली आणि बघतच राहिलो...
     तेवढ्यात त्यांनी मला बघितले आणि माझ्याकडे येत मला आवाज दिला," नमस्कार पाटील मालक" आणि मी भानावर आलो. मी ही त्यांना गड़बडून नमस्कार म्हणालो. आणि त्यांना काही बोलणार तेवढ्यात ते बोलले म्हणाले बरं झालं तुमी आला, बगा की कसलं भारी पीक आलंय... पुढे ते काही बोलणार त्याआधी मी त्यांना प्रश्न केला की, अहो तुमचं इतकं चांगलं शेत असताना का आमच्या कोरडवाहु जमिनीत इतकं का राबता???
तेंव्हा त्यांनी सांगायला सुरु केली त्यांची कर्मकहानी...
     मालक हा भाग दुष्काळी, घरात मी, बायको, तीन पोरी (एकीचे लग्न झालेले आहे) आणि एक पोरगा. आमची छोटी जमीन, कष्टाची तयारी आहे पण पावसाचा भरवसा नाही एक वर्षी आहे तर चार वर्षं नाही. मग जगायला हातभार म्हणून शेळ्या केलेल्या हायत. शेतात राबनुकिसाठी दोन बैल आन दूद दुबत्यासाठी ह्या दोन म्हशी. मग ज्या सालाला पावुसपानी नाय त्या सालाला माणसं जगायच् अवगड़ तर तिथं या जनवाराच्ं काय करायचं म्हणून तुमचं शेत कसतु बगा म्हंजी यांच्या चाऱ्याची सोय हुती. आन पावुस झाला एकांद्या वर्षाला तर मग तुमाला सुडून माजंच् शेत बगुन कसं माणुसकीला सोडल्यागत हुईल की...
ते त्यांच्या शेतातील गहू, ज्वारी, डाळींब, वांगी, कांदा, मेथी, मिरची आणि इतर पीके दाखवत मागील काही वर्षात नापिकीमुळे झालेले आठ नऊ लाखांचे कर्ज, काल एका पाहूण्याच्या घरी झालेली चोरी आणि दुर्दैवी मृत्यु प्रकरण, थोड्या वेळानी दुसऱ्या एका भावाच्या किडनी ख़राब झालेल्या जावयाला बघायला जाण्या संदर्भात आणि बरेच काही सांगत होते, मी फक्त ऐकत होतो. मात्र त्यांच्या या सर्व सांगण्यामागे कुठेही उगाच परिस्थितीचा उहापोह करणे किंवा दुसऱ्याकड़े फुकटाची मदत मिळवणे हा उद्देश् नक्कीच न्हवता. मी स्तब्ध झालो होतो. कान बधीर होई पर्यंत एफ. एम्. ऐकणाऱ्या मला आता ऐकू येत होता फक्त एका परिस्थितिला बाराही महीने हिमतीने लढ़ा देत आपलं कुटुंब आनंदाने चालवणाऱ्या सच्च्या माणसाचा आर्त अन्तर्मुख व्हायला लावणारा आवाज...
      बोलत बोलत आम्ही परत त्यांच्या घरी पोहोचलो होतो. जेमतेम वाकुन उभं राहता येईल असे छपराचे घर पण आदरतिथ्य लाजवेल एखाद्या राजाच्या राजमहालातील आतिथ्याला. आतून त्यांच्या सहचारिणीने आदराने गरम दूध आणून दिले ते पिवुन व्हायच्या आत मी नको म्हणत असतानाच त्यांनी एका कन्येला आमच्यासाठी डाळिंब आणायला सांगितली तर दुसरीला शेतातून वांगी. आणि म्हणतात ना, "बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा" या उक्ति प्रमाणेच अक्षरशः मला (आम्ही वरुन मला वर आलो पण अजून मी पण आहे तेही जाताना दिसेल तुम्हाला) ते स्वीकारायला लाज वाटावी इतकी डाळिंब आणि वांगी त्या मुलींनी आणली आणि त्या ही काही अडाणी नाहीत बरं त्यातली एक एस.वाय. बी.एस्सी. ला शिकत आहे (हे आवर्जुन सांगतोय कारण मला हे सांगायचे आहे की एक त्या मुलींना दुनियादारी माहीत आहे आणि दूसरे म्हणजे स्वतः अडाणी असलो तरी मुलं अडाणी राहू नयेत म्हणून ते कितीही कष्ट पडले तरीही मुलांना शिकवत आहेत) मी म्हणालो ही इतके काय करायचे आहे? तर त्यांचे उत्तर असे की, "तुमचा बऱ्याच लोकांशी संबंध येतो, वाटा त्यांना...
     आपलं काय हाय वो त्यात? देवाला वाटलं म्हणून त्यानं आपल्या पदरात टाकलंय हे पीक. आवो मालक एक येळ आशी हुती की आमी लोकाच्या शेतात हुड़कुन हुडकुन कदितर एक डाळींब खायाचु आन आता इतकं पिकलंय तर खावुद्या की समद्यास्नी..."
   काय म्हणावे या वृत्तीला? अहो या कलियुगात प्रत्येकजण पैशाच्या मागे सतत पळत असतो कोणी कोणाची साधी विचारपुस करत नाही कित्येकदा मुलं आई बापाला किंमत देत नाहीत अशा काळात ते त्यांना माहीत ही नाहीत अशा माझ्या ओळखीच्या लोकांना, स्वतः वर लाखोंचे कर्ज असताना, कधी नाही ते चांगले पीक पिकले असून त्याला बाजारात चांगला भाव पण मिळत असताना, कष्टाने पिकवलेले खुशाल वाटतो आहे आणि त्यांचे कुटुंब पण त्यांना साथ देत होते... इथे लक्षात आले की खरंच, देण्यासाठी दानत लागते श्रीमंती नाही.”
क्षणार्धात मला आठवली मघाशी त्यांच्या घरी येताना रस्त्यात लोकांची मंदिरातील देवाच्या दर्शनासाठी लागलेली लांबंच लांब रांग... देवाच्या पिंडीवर एकशे आठ बिल्वपत्र वाहून अभिषेक करणारे भाविक...
आणि मला मात्र इथे साक्षात्कार होत होता, एक गोरा नसला तरी सर्वांगावर भस्म धारण केल्यावर दिसेल असा चमकदार चकचकित सावळा वर्ण असलेला, धीप्पाड़ आणि राकट शरीराचा, रागिट चेहरा पण कुणाच्याही थोड्या गोड बोलण्याने लगेच भुलणाऱ्या मऊ मनाचा, स्वतः ला काही स्वीकारता आम्हालाच प्रसाद म्हणून एकशे आठ डाळींब देणारा आणि आपल्या प्रगल्भ विचार शक्तिचा तिसरा डोळा उघडून आमच्या सारख्या अहंभावी संसारी व्यक्तीचा सर्व अहंकार जाळून, “मीपण संपवून आमचे आयुष्य पवित्र बनवणाऱ्या
सगुण साकार भोळ्या सांभ शिवाचा... भोळ्या सांभ शिवाचा...!
     तिथून माघारी निघालो आणि एफ. एम्. ला सुरु होते विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केलेले आणि अजय गोगावले यांनी गायलेले एक अप्रतिम गाणे....
दाता तेरा कैसा रहमो करम... हो दाता तेरा कैसा रहमो करम...”
आपलाच्:- ओंकार अर्थात MadOm!