Go Green

निसर्ग माझा मित्र




निसर्ग हा दानशूर आहे. परंतु निसर्ग बोलत नाही. पण कृती करतो.
मित्र हा दु:खात आणि सुखात सहभागी होतो. निसर्ग हा कोणताही भेदभाव करत नाही. आपल्या समाजात विषमता आहे. माणूस विषमतेने वागतो. परंतु निसर्ग विषमतेने वागत नाही. म्हणूनच निसर्ग ह मला माणसापेक्षा जवळचा सोबती वाटतो.
झाडं, नदी, समुद, पाणी, रंग, निसर्गाने खूप किमया केली आहे. 'सोनचाफा'फुलामध्ये नाही का, पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि त्याचा देठ हिरवा.

म्हणून मला निसर्गाविषयी असे म्हणावेसे वाटते,

अनंत हस्ते कमला वराने (निसर्गाने)

देता घेशील दो कराने.

निसर्ग जो आपल्याला भरभरून देत असतो.

ते घ्यायला आपले दोन इवले हात अपुरे पडतात.









निसर्गाचे चिरंजीवित्व आणि मानवाचे भवितव्य

डॉ. राजीव शारंगपाणी


लेख:- निसर्गाचे चिरंजीवित्व आणि मानवाचे भवितव्य

डॉ. राजीव शारंगपाणी

डॉ. राजीव शारंगपाणी व्यवसायानं क्रीडावैद्यकतज्ज्ञ आहेत. सामाजिक प्रश्नांविषयी वेगळा विचार ते सातत्यानं मांडत आले आहेत.




आपल्याभोवती जे काही आहे ते निसर्गच आहे हे आपण बरेचदा विसरतो. त्यामुळे चिमणीचे घरटे किंवा आपली घरे हे दोन्हीही निसर्गाचाच एक भाग आहे हे आपण विसरतो. वाळवंट आणि घनदाट अरण्य हे निसर्गाचाच भाग आहेत. त्यातले एक चांगले आणि एक वाईट असे आजिबात नाही. हे लक्षात न आल्याने माणसे कुढत बसतात. म्हणजे, नदी हे गटार झाले असले तरी गटार हाही निसर्गाचाच भाग आहे हे विसरून चालत नाही. आता आपल्याला गटारापेक्षा स्वच्छ पाण्याची नदी आवडेल हा भाग सोडा पण कित्येक किड्यांना; की जे निसर्गाचाच एक भाग आहेत; गटार खूप आवडते. आपल्याला श्रीखंड आवडते म्हणून शेणकिड्याला श्रीखंडात टाकून चालत नाही, तो मरेल. त्याला शेणच लागते. हे अद्वैत एकदा लक्षात आले की आपल्यासमोर जो निसर्ग आहे तो आहे तसा आपल्याला समजू लागतो.

आपल्या सोयीसाठी आपण निसर्गात अनेक बदल घडवून आणतो तसे सर्व प्राणी थोड्याफार प्रमाणात करतातच. हे करताना निसर्गाची कमीजास्त प्रमाणात नासधूस होतेच. अर्थात नासधूस ही आपली कल्पना आहे. निसर्गात फक्त बदल होतो. `नासधूस' होत नाही. म्हणजे झाडांवर रोग पडतात मग झाडे मरतात. पण रोग ज्यामुळे होतो ते कृमी, कीटक हे निसर्गाचाच भाग असतात. त्यांची प्रजा झाडे मेल्याने वाढते. आता आपल्याला हे पाहवत नाही हा भाग वेगळा. पण म्हणून आपल्या सोयीचा निसर्ग आपण `निसर्ग' मानतो आणि आपल्याला गैरसोयीचा भाग आपण दृष्टीआड करतो. आपण मोठमोठ्या वसाहती बांधतो. त्या बांधताना बाभळी वगैरे `घाणेरडी झाडे' तोडून टाकतो. आपल्याला आवडतात अशी झाडे भलतीकडून आणतो. त्यांच्यावर फवारे वगैरे मारून त्यांना जगवतो. आता निसर्गात `घाणेरडे', `निरूपयोगी' असे झाड नाही. ह्या आपल्या कल्पना आहेत. ह्या कल्पनांच्या आहारी जाऊन अरण्याचे वाळवंट झाले की काहीतरी वाईट झाले असे आपल्याला वाटते. निसर्गात म्हणाल तर फक्त बदल झाला. आता अरण्यात राहणाऱ्या प्राण्यांऐवजी वाळवंटातले प्राणी येतील आणि राहू लागतील. फार कशाला मानवजात अस्तित्वात येण्याअगोदर सहारा वाळवंटात घनदाट जंगल होते ते निसर्गत: नाहीसे झाले. त्याला आपण जबाबदार नाही.

निसर्ग चिरंजीव आहे. तो दयाळूही नाही आणि दृष्टही नाही. या दोन्ही मानवी भावना आहेत. तो निर्गुण आणि भावनाविरहित आहे. त्याला काही प्राणी, पक्षी, झाडे, किडे फार कशाला संपूर्ण मानवजात जरी नष्ट झाली तरी काहीही फरक पडत नाही. आता आपल्याला हे मंजूर नाही, ही आपली गोष्ट झाली. निसर्ग हा सदैव संतुलित राहतो. हे संतुलन `चल' असते. म्हणजे इतकी झाडे, इतके प्राणी, इतके पक्षी असले म्हणजेच संतुलन असते असे नाही. फार कशाला पृथ्वीतलावर जितके प्राणी अगर जीव उत्पन्न झाले, त्यातील ९९% जीव मानव उत्पन्न होण्याआधी नाहीसे झालेले आहेत. म्हणजे त्या जीवांचा नाश होण्यात मानवाचा काहीही हातभार नाही. आपला अहंकार एवढा जबरदस्त आहे की आपण निसर्गाचाच एक भाग असताना निसर्गाला वाचवण्याची भाषा करतो. प्राण्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो. पण प्राण्यांना आपली जात वाचावी असे काही वाटते की नाही कोण जाणे ? कारण वाघांना आपण वाचवायचा प्रयत्न करतो पण हे वाघच वाघिणीला दुसऱ्या वाघापासून झालेल्या पिल्लांना खातात. कारण असे केल्याशिवाय त्यांना वाघिणी संबंध ठेवू देत नाहीत. म्हणजे वैयक्तिक स्वार्थासाठी वाघांना आपली जात नामशेष झाली तरी चालते. याउलट डासांना आणि असंख्य रोग उत्पन्न करणाऱ्या जंतू, कृमी आणि किड्यांना आपण नाहीसे करायचा आटोकाट प्रयत्न करतो पण ते आपल्याला पुरून उरतात आणि आपल्या प्रतिजैविकांना दाद देत नाहीत.

आपण काही वेगळे नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी आपण काहीही करायला मागेपुढे पाहत नाही. निसर्ग, पर्यावरण हे फक्त शब्द आहेत. त्यांचा आपल्याला थोडा जरी अंदाज असता तर आपण भयानक शस्त्रे उत्पादन करणे त्वरीत थांबवले असते. आपल्याला एकमेकांना ठार मारायला काहीही वाटत नाही तर प्राणी, पक्षी, किडे, मुंग्या यांना मारायला आपल्याला कसे काय वाईट वाटेल ? निसर्ग म्हणजे आपण सर्व एकत्र आहोत असे आपल्याला कधीच वाटत नाही. आपला आपपरभाव विलक्षण आहे.

अणुऊर्जेचा पाठपुरावा करताना अणुऊर्जा मिळाल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांचे काय करायचे हे जगात कुणाला कळलेले नाही ही गोष्ट लपवली जाते. काही देश हे पदार्थ जमिनीत गाडतात. काही देश हे पदार्थ चक्क समुद्रात लोटून देतात. हे किरणोत्सारी पदार्थदेखील निसर्गाचाच एक भाग आहेत. निसर्गातील काही पदार्थ हे किरणोत्सारी असतात. त्यांचा वापर केला तरी त्यांचा किरणोत्सर्ग थांबत नाही. एवढाच त्याचा अर्थ. सामान्य अकलेच्या माणसालादेखील कळेल की साधे पेट्नेल वापरल्यावर होणाऱ्या धुराचे काय करायचे हे आपल्याला अजून कळलेले नसताना अणुऊर्जा वापरायला लागून आगीतून फुफाट्यात पडण्यात काही अर्थ नाही. भारतासारख्या उत्तम सूर्यप्रकाश मिळणाऱ्या देशाने असल्या भयंकर ऊर्जेच्या मागे न लागता सौरऊर्जा मिळविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत, पण वैयक्तिक स्वार्थापोटी भारतातले मोठेमोठे शास्त्रज्ञ अणुऊर्जेचा हिरिरीने पुरस्कार करताना दिसतात.

`पर्यावरण'वाद्यांचा दहशतवाद वाढत चालला आहे. निसर्ग म्हणजे काय हे फक्त आम्हांलाच कळते असा त्यांचा दावा आहे. एवढेच नव्हे तर काय केले की निसर्गाची तब्येत सुधारते आणि काय केले की ढासळते हे फक्त त्यांनाच कळते असा त्यांचा दावा आहे. झाडे लावली की पाऊस पडतो असे हास्यास्पद विधान ते बिनदिक्कत करतात. तुकारामांच्या काळात मरीआईचा दुष्काळ सलग तेरा वर्षे पडला होता. तेव्हा आजच्या मानाने खूप झाडे असणार असे अनुमान काढता येते. `ग्लोबल वॉर्मिंग'च्या नावाखाली आपली पोळी भाजून घेण्याची शर्यत विकसित देशात लागली आहे. आपण त्याचे बळी आहोत. आजवरच्या इतिहासात अशी असंख्य वेळा गरम आणि गार युगे येऊन गेली आहेत, त्याचा माणसाच्या गैरव्यवहाराशी संबंध नाही असे अनेक शास्त्रज्ञ जीव तोडून सांगत आहेत पण त्यांचे कोण ऐकतो ?

(ध२घ) नावाचा वाह्यातपणा झाल्याला फार दिवस झालेले नाहीत. वायटूके हा संपूर्णपणे फसवणुकीचा प्रकार होता हे सर्वांना उशिरा कळले. ग्लोबल वॉर्मिंग हे त्याच प्रकारचे आहे.

पर्यावरण हे दहशतवादाचे एक रूप होत चालले आहे. ते जास्त धोकादायक अशाचसाठी की आम्ही काय हे स्वत:साठी करीत नाही. आम्ही हे निसर्गासाठी आणि मानव जातीच्या उद्धारासाठी करीत आहोत हा त्यांचा दावा. हा कदाचित खराही असेल, जे खरंच असे समजतात ते भाबडे आहेत. त्यांच्यावर जे विश्वास ठेवतात ते अधिकच भाबडे आहेत. आम्हांला निसर्गाविषयी कळते हे त्यांचे विधान अत्यंत धोकादायक आहे. धरणांना विरोध करताना बीव्हर नावाचे प्राणी बऱ्यापैकी मोठी धरणे बांधतात हे ते विसरतात. धरणामुळे होणारे विस्थापित हा मानवाने मानवाविरुद्ध केलेला अक्षम्य गुन्हा आहे पण धरण हा निसर्गाचाच भाग आहे आणि तो तसा बनून जातोच हे कसे विसरावे? जिथे पाणी नव्हते तिथे आले एवढाच बदल झाला फक्त तो मानवाने केला एवढेच. हिमालयात दरडी कोसळतात आणि आपोआप धरणे बनतात. बदल झाला एवढेच.

मानवजातीने आपल्यापुरते पाहण्याचे जरी ठरवले तरी तिचे भवितव्य माकडांना जर बागेत सोडले तर ती जशी नासधूस करतात तसेच असेल. आपण माकडांचे वंशज. पण अक्कल ही तेवढीच किंवा किंचित कमीदेखील म्हणता येईल. कारण माकडे शस्त्रास्त्रांचे कारखाने, अणुऊर्जा, पैसे, वाहने, सिनेमे, नाटके, ध्वनिक्षेपके, युद्धे, महायुद्धे, दहशतवाद, वेश्याव्यवसाय, स्त्रीभ्रूणहत्या, प्राण्यांवर केलेले शास्त्रीय प्रयोग, धर्म, जाती, लग्ने, उत्सव, समारंभ, पारितोषिक वितरणे, कपडे, फॅशन्स, व्यवसाय, कंम्प्युटर, टेलिफोन, हेल्थक्लब इत्यादी गोष्टीतली एकदेखील गोष्ट करीत नाहीत. पण म्हणून ते जास्त नैसर्गिक आणि आपण कमी असे नाही, फक्त आपण जास्त मूर्ख एवढेच.

मानवजातीचे भवितव्य काहीही असले तरी निसर्गाला काडीमात्र फरक पडत नाही. समजा अचानक पृथ्वीवरील सर्व माणसे नाहीशी झाली तरी सूर्योदय तसाच होईल, सूर्यास्त तसाच

होईल, लाटा तशाच येतील. वारा तसाच वाहील, डोंगर तसेच पाऊस झेलतील आणि त्यांच्यावरून नद्या तशाच वाहतील. झाडेझुडपे, प्राणी, पक्षी तसेच एकमेकाला खातील. निसर्गातला एक भाग कमी झाला तरी निसर्ग कमी होत नाही. निसर्गात एक भाग वाढला तरी तो वाढत नाही. तो तसाच राहतो.

आपल्याला भवितव्याचा विचार करण्याची गरज नाही. आपल्याला आत्ता इथे आणि या क्षणात भानावर येण्याची गरज आहे. आत्ता ठेवलेली वीट जर नीट ठेवली तर त्यावर ठेवलेल्या विटा नीटच राहतील. आत्ता तोल गेला तर काही वेळाने विटा ठेवता ठेवता इमारत ढासळणारच. प्रयत्न आपल्या हाती आहेत. प्रारब्ध कुणाला उमगले आहे ?

ओम् !!! हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण येते. पूर्णातून पूर्ण बाहेर आल्यावर पूर्ण शिल्लक राहते.

$ पूर्णमिदं । पूर्णात पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।